लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात वादातून चाकूने सपासप वार करून जखमी झालेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरातील सोळा खोल्या येथे सागर पूनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे रा. सिंध्दार्थ नगर रामेश्वर कॉलनी हे अज्ञात कारणावरून शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करून तुमच्या ‘एरीयाचा दादा पवन घातक याला बोलव, तो साला खूप माजला आहे, त्याला सुध्दा बघतो’ असे ओरडत होते. त्यावेळी पवन हा त्याच्या घरात जेवन करत होता. त्याचा नावाचा उल्लेख केल्यामुळे पवन हा सागर आणि विशाल यांच्याकडे येवून दोघांच्या भांडणात माझे नाव कश्यामुळे घेत आहेत असा जाब विचारल्याने पवन आणि त्याच्या कुटुंबियाला सागर आणि विशाल यांनी शिवीगाळ केली. यात पवन दोघांच्या अंगावर धावून गेला आणि तिघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान यात विशाल सपकाळे याने पवनला मागून पकडून धरले तर सागर कंडारे याने हातातील चाकूने पवन उर्फ घातक याच्यावर सपासप वार केले. यात पवन गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पवन उर्फ घातकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पवनचा भाऊ प्रतिक मुकुंदा सोनवणे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर कंडारे आणि विशाल सपकाळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.