धुळे : वृत्तसंस्था
एका मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढवत सहा महिन्यांच्या बालिकेस जखमी केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात घडली आहे. पण सुदेवाने बालिकेच्या अंगात स्वेटर असल्यामुळे बालिका बचावली असून या हल्ल्यात बालिकेच्या हाताला गंभीर जखम झाली असून बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात शरद पोपट देवरे यांच्या शेतात रामपुरा (ता. बागलाण) येथील भगवान झुलाल हळनर यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी आहे. दरम्यान १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. मेंढ्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याने मेंढीऐवजी मेंढपाळाजवळ झोपलेल्या सहा महिऱ्यांची बालिका पूनम भगवान हळनर हिला उचलून नेले. बालिकेच्या रडण्याच्या आवाजामुळे मेंढपाळ कुटुंब जागे झाले. आरोळ्या मारल्यामुळे बिबट्याने बालिकेस सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिस पाटील मनोज खोंडे यांनी धुळे वन विभागास माहिती दिली. जखमी पूनमला स्वतः मेंढपाळ कुटुंबानेच नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.