नाशिक : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील निफाड येथील बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून नोकरीला असलेली महिला व तिच्या मुलाने २० कोटींच्या खंडणीची मागणी करत १ कोटी रुपये स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या एका कार्यकारी सदस्याकडून उकळले होते. यातील काही रोकड संशयित सारिका सोनवणे हिचा देवळ्यात राहणारा भाऊ संशयित विनोद सयाजी चव्हाण (४१) याने दडविल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. त्यास न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली.
स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगत वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून संशयित मायलेकांनी खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.