नंदुरबार : प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी १३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची फाईल बंद करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील एका खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. अनक रामा वळवी (३२) रा. सोनारे, ता. नवापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे इतर साथीदार अशा एकूण १३ जणांविरुद्धची नवापूर तहसील कार्यालयात प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वळवी याने ही कारवाईची फाईल साहेबांना सांगून बंद करून देण्याच्या मोबदल्यात १३ जणांकडून प्रत्येकी एक हजार अशी १३ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार देण्याचे मान्य झाले. यापैकी सात हजार रुपये वळवी याने तक्रारदाराकडून आधीच स्वीकारले आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात उर्वरित तीन हजार रुपये स्वीकारताना पथकाने त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, संदीप नावाडेकर, विजय ठाकरे, यांच्या पथकाने केली आहे.