नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असून आता पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
न्यायालयाने यापूर्वी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे न्यायालयात उभे केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत अजून तीन दिवसांची वाढ करण्यात आली. हिरे कुटुंबियांशी संबंधित येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी 10 वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी 46 लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक झाल्या प्रकरणी येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात 27 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बुधवारी अद्वय यांना अटक झाल्यावर न्यायालयाने 20 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली होती.
सोमवारी पोलिसांनी दुसऱ्यांदा हिरे यांना न्यायालयात उभे केले. गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद यावेळी सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. त्यानुसार जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी 23 नोव्हेंबरपर्यंत हिरे यांची पोलीस कोठडी वाढवली. यावेळी हिरे समर्थकांची न्यायालय परिसरात मोठी गर्दी दिसत होती.