मुंबई : वृत्तसंस्था
प्रेयसीसोबत झालेल्या भांडणातून पोलिसाने वरळी पोलिस वसाहतीतील अभ्यासिकेत गळफास घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी रात्री घडली. आत्महत्येपूर्वी पोलिस शिपायाने प्रेयसीच्या एका मैत्रिणीला गळफास घेत असल्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिस वसाहतीत इंद्रजीत साळुंखे (२७) हा कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याचे गोरेगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीसोबत गत एप्रिलपासून प्रेमसंबंध होते. रविवारी तो प्रेयसीला वरळी सी फेस येथे भेटला, साळुंखे हा दुसऱ्या मुलीसोबत चॅटिंग करत असल्याच्या संशयातून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर साळुंखेने प्रेयसीला दादर रेल्वे स्थानकावर सोडले. त्याने तिचा मोबाइल तपासला असता प्रेयसीने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीला गळफास घेत असलेले छायाचित्र आणि आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवत आत्महत्या केली.