भडगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील छोट्या मोठ्या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असतांना नुकतेच एरंडोल-येवला मार्गावर भडगाव तालुक्यातील गुढे गावातील भरत काशिनाथ माळी (वय ५२) यांचा दि. १९ रोजी अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकलेले नाही. दिवाळीनिमित्त घरी पाहुणे आलेले होते. त्यातच माळी हे शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री पाणी देऊन परत येत असताना त्यांचा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी रात्री शेतात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर भरत माळी हे पाणी देण्यासाठी जात होते. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना मनाई केली. मात्र तरीही ते शेतात गेले. त्यानंतर गुढे गावाजवळ विश्वास नगर येथे अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे रुग्णालयात नेण्यात , आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यावर दि. २० रोजी गुढे येथे दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली असा परिवार आहे. ते गुढे येथील निवृत्ती व सोपान माळी यांचे वडील होत.