नंदुरबार : वृतसंस्था
जिल्ह्यातील एका गावात डाकीण असल्याचा संशय घेत एका महिलेला स्मशानातील राख खाऊ घातल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात संशयित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा या गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने संशयित पाडवी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा येथे संशयित धनसिंग टेमऱ्या पाडवी व फुलवंती धनसिंग पाडवी यांनी एका महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरून दि. ७ जुलै रोजी मारहाण केली होती. त्यावेळी समाजात बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेने शेतीच्या कारणावरून भांडण केल्याची तक्रार दिल्याने धनसिंग पाडवी व फुलवंती पाडवी या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पीडित महिला व तिचे कुटुंबीय चिखली येथे स्थलांतरीत झाले होते. दरम्यानच्या काळात पीडित महिलेची उकलीआंबी कुवापाडा येथील शेती संशयित करीत असल्याचे कळाल्याने पीडित महिलेने शेताकडे जाऊन पाहिले. यावेळी संशयितांनी शेताची मशागत केल्याचे दिसून आले.
यावेळी संशयित पाडवी यांनी पीडित महिलेला व तिच्या पतीला डाकीण म्हणत दमदाटी करून मारहाण केली, तसेच डाकीण नसल्याचे सिद्ध करण्यासाठी कुवा येथील स्मशानभूमीतील जळालेल्या मृतदेहाची राख खाण्यास भाग पाडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित धनसिंग पाडवी व फुलवंती पाडवी या दोघांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.