पुणे : वृत्तसंस्था
अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना वाढत असतांना एक धक्कादायक घटना आता पुणे शहरातून समोर आली आहे. चक्क एका काकानेच तीन वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने शनिवारी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला आहे. याबाबत केतन मेहतर (वय- ३८, रा. वडगाव शेरी) यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार महिला तिच्या ३ वर्षांच्या मुलीला घेण्यासाठी नणंदेच्या घरी गेली होती. त्यावेळी चिमुकली नणंदेच्या खोलीत झोपली होती. नणंदेचा पती आपल्या मुलीबरोबर अश्लील प्रकार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेने जबाब नोंदवला. याप्रकरणी आरोपी केतन मेहतर याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करत आहेत.



