मलकापूर : वृत्तसंस्था
शहरातून पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्यानजीक झाल असून या अपघात ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात चिंचपूर फाट्यावरील कमानीनजीक घडला. बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली व अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तर काहींच्या सांगण्यानुसार बसचालक भ्रमणध्वनीवर बोलत होता. त्यावेळी समोर दुचाकी आल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. एमएच-४०-एक्यू-६१३९ क्रमांकाची ही बस पुण्यासाठी जात होती. बसमध्ये नेमके किती प्रवाशी होते हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.



