जळगाव : प्रतिनिधी
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील ९ तांड्यामध्ये तर धरणगाव तालुक्यातील एका तांडा वस्तीत अश्या १० तांडा वस्तीत विविध विकास कामांसाठी १ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधीही वितरीत करण्यात आला आहे. “ वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना” ही तांडा वासियांना वरदान ठरत असून यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्यामुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे.
राज्यात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती , जमाती असूनअद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर , पारधी अशा अनेक समूहांचे तांडे / वस्त्या असून अशा तांड्यांमध्ये या जाती/ जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत असले तरी या प्रवर्गातील बहुसंख्य समाज गरीबीची जीवन जगत आहे. तांडे, वाडी किंवा वस्त्यांमध्ये सध्या या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच ठिकाणी या समाजास स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून शासनाने विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या ३० जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार “ वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुरु केली आहे
या कामांना मिळाली मंजुरी !
वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे – १५ लक्ष, रामदेववाडी येथे सभामडप बांधकाम करणे – १५ लक्ष, म्हसावद येथील हटकर/ धनगर वस्तीत सभामंडप बांधकाम करणे – १५ लक्ष, धानवड तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे – १५ लक्ष, वसंतवाडी तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – ५ लक्ष, मोहाडी येथील बंजारा वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष, विटनेर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – ५ लक्ष, लमांजन येथील हटकर / धनगर वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष तसेच कुऱ्हाळदे तांडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष तर धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे – १५ लक्ष असे एकूण १ कोटीच्या विविध विकास कामांसाठी शासनाने प्रशाकीय मान्यता दिली असून निधीही वितरीत करण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने मान्यता देवून शिफारस केलेल्या कामांचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला होता. मंजूर विकास कामांमुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे.


