धुळे : वृत्तसंस्था
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात चोरट्याने हातसफाई करत २० हजार रुपयांचा संगणक लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावळदे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील लिपीक इसा गणी गिरासे (वय ४९, रा. श्रीकृष्ण कॉलनी, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दिवाळीनिमित्त शाळेला सुटी असल्याने शाळा बंद होती. मुख्याध्यापक दालनालासुध्दा कुलूप होते. चोरट्याने ही संधी साधत मुख्याध्यापक दालनाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला.
चोरीची ही घटना मंगळवारी रात्री ११:०० ते बुधवारी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास घडली. मुख्याध्यापकांसह शिक्षकवर्ग शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापक दालनाला लावलेले कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक टाकणे घटनेचा तपास करीत आहेत.