जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील एक २२ वर्षीय तरुण परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेला असतांना त्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घटना फर्दापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली असून त्या तरुणाचे नाव हर्षल सतीष बाणाईत (वय २२) असे समजते. फर्दापूर येथील महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात हर्षल शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ पासून परीक्षा सुरू होणार असल्याने हर्षल हा लोकेश रडे या मित्रासह घरून निघाला महाविद्यालयात दुपारी हॉल तिकीट घेतले व घराकडे निघत असतानाच त्याला महाविद्यालयातच भोवळ आली. त्यात हर्षल खाली कोसळला. त्याला वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथून पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. यासीर खान यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परिवारात हर्षल मोठा मुलगा असून हुशार होता. त्याची परिस्थिती हलाखीची असून वडील सलून दुकानदार आहेत.