गडचिरोली : वृत्तसंस्था
एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भेट देऊन आदिवासी व पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर रात्री भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील दिनेश पुसू गावडे(वय २७) असे मयत तरुणाचे नाव औष्ण पेनगुंडा-नेलगुंडा रस्त्यावर दिनेश गावडेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ठेवली. चिठ्ठीत पोलिसांचा खबऱ्या असल्यामुळे दिनेशची हत्या केल्याचे म्हटले.
पेनगुंडा येथे कामावर लावलेल्या ट्रॅक्टरच्या देखरेखीसाठी दिनेश पेनगुंडा येथे गेला होता. मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिनेश गावडेची हत्या नक्षल्यांनी केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, तो पोलिसांचा खबऱ्या नव्हता. नक्षलवादी निरपराध नागरिकांना ठार करताहेत, असे नीलोत्पल यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला. या वेळी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.