भडगाव : प्रतिनिधी
भाऊबीजेला भाऊ आणि बहिणींच्या नात्याला मोठे महत्व असून भाऊबीजेच्या दिवशीच तरुण भाऊ गमावल्याने दिवाळीच्या सणावर पूर्णपणे विरजण पडले. बहिणींना भाऊबीजच्या दिवशीच भावाच्या अकाली निधनाच्या बातमीने धक्काच बसला. जामनेर येथील मूळ रहिवासी व धुळे येथे स्थायिक झालेल्या दत्तात्रय सोनार यांचा चाळीसगाव येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक झालेले दत्तात्रय काशिनाथ सोनार (वय ४२) यांचा चाळीसगाव येथे चारचाकी वाहनातून जाताना हृदयविकाराने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जामनेर व धुळे येथील त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत दत्तात्रय सोनार यांचा भाऊबीजेच्या शुभ दिनीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाने हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला. या वेळी हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. मेहनती व कष्टाळू आणि तेवढाच सर्वांशी आपुलकीने वागणारा, हसतमुख व घरातील कर्ता पुरुषाच्या आकस्मित निधनाने समाजमन पूर्णपणे सुन्न झाले आहे. मयत दत्तात्रय सोनार यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, बहिण असा परिवार आहे. मयताची पत्नी व वडिल गमावणाऱ्या लहान बालकांनाही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. मयत दत्तात्रय सोनार यांच्यावर धुळे येथे शोकाकुल वातावरणात अत्यंस्कार करण्यात आले. या वेळी मयताचे नातेवाईक, राजकीय, सामाजिक व सुवर्णकार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.