वाशीम : वृत्तसंस्था
राज्यभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना वाशिम शहरातून एक क्लिनिकला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिकला लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नसल्याचे घटनास्थळावरुन सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिक आहे. या क्लिनिकला रात्री बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीची माहिती वाशिम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग पूर्णपणे विझविली. या आगीत क्लिनिक साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत जूने सागवानी लाकडी साहित्य सुद्धा जळाले आहे. या आगीत लाखाेंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.