नागपूर : वृत्तसंस्था
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षापासून मोठी गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच एका भाजपचे पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची एका हत्या केलायची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) या दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करत होते. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी राजू डेंगरे यांच्याशी पैशांची मागणी केली. गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये घ्यायचे होते. मात्र राजू ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. यावरून त्यांच्यात वादही झाला होता. राजू डेंगरे पैसे देत नसल्यानं दोघेही चिडले होते. पैसे देत नसल्याच्या रागात त्यांनी डेंगरे यांच्या हत्येचा कट रचला.
रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विशेषकुमारनं आदीच्या मदतीने राजू यांचा कपड्यानं गळा आवळला. त्यानंतर चाकूने वार करत राजू यांची हत्या केली. राजू यांच्या अंगावर ब्लँकेट टाकत दोघेही कार घेऊन फरार झाले. होते. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तपास स्वत:च्या हाती घेत पथकांना कामाला लावले. पोलिसांनी खबऱ्यांनाही कामाला लावलं. एका खबऱ्यानं नियमितपणे ढाब्यावर जेवायला येणाऱ्या विशेषकुमारच्या मित्राबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांना विशेषकुमारचा मोबाइल क्रमांक मिळाला, त्याआधारे पोलिस मंडला येथे पोहोचले. त्यानंतर त्यांना अटक केली.