बारामती : वृत्तसंस्था
राज्यभर गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या तरुणाचे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.
बारामतीत गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. चंद्रकांत वाघमोडे या युवकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची हाक देण्यात आली. या बंदला बारामतीत उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरातील बाजरपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.