मुंबई : वृत्तसंस्था
दिवाळीची लगबग राज्यभर सुरु असतांना तळवडे-म्हाळाईवाडी येथे एअरगनने फायर केलेला छर्रा पाठीत लागून मोहन भिवा मालवणकर (वय ५२) हे जखमी झाल्याचा प्रकार रविवारी दि. १२ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेजारील अंकुश सीताराम लोके (वय २४) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री.मालवणकर हे घराकडे चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळल्याचे जाणवले. या वेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी अंकुश लोके याच्यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्ती धावत आल्या. अंकुश लोके याच्या हातात या वेळी एअरगन होती. त्याने मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत खालील भागास एअरगनचा छर्रा लागल्याचे दिसून आले. मी माकडांवर फायर केलेला छर्रा झाडावर आदळून तुम्हाला लागला असावा, असे या वेळी लोके याने सांगितले.
त्या वेळी मालवणकर यांना फारसा त्रास होत नसल्याने घरीच उपचार करून ते झोपले; मात्र आज सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले. छर्रा आतमध्ये गेलेला असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता बांबोळी- गोवा येथील इस्पितळात हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. येथील पोलिस ठाण्यात मालवणकर यांचा मुलगा महेश मालवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंकुश लोके याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे