नवी दिल्ली : वृत्तसंस्था
किक्रेट जगात अफगाणिस्तानने आपला दबदबा निर्माण केलाय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने अनेकांना चकित केलं आहे. वर्ल्ड कप २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघाची चर्चा होतेय. याशिवाय अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची चर्चा अधिक होऊ लागलीय. गुरबाजचं कृत्य पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
अहमदाबाद येथे रहमानउल्ला गुरबाज त्याच्या कारमधून जात होता. त्यावेळी त्याला निराधार आणि बेघर लोकं फुटपाथ झोपलेले दिसली. यानंतर गुरबाज आपल्या कारमधून बाहेर आला आणि दिवाळीनिमित्त सर्वांना भेटवस्तू देऊ लागला. गुरबाजने मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना पैसे देऊन मदत केली. गुरबाजने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या उशाशी ५००- ५०० नोटा ठेवत त्यांना दिवाळीची भेट दिली.
निराधारांसाठी यापेक्षा चांगली दिवाळी भेट असू शकत नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गुरबाजच्या या कृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत. दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिलीय. त्यांनी ९ सामन्यात ४ विजय मिळवत पाईंट्स टेबलवर ६ वे स्थान काबिज केले. यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्र ठरलाय. वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेश आणि भारताने अफगाणिस्तानचा पराभव केलाय. १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा पराभव केला होता.