जामनेर :प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पेठ येथील नवनिर्वाचित सरपंच अब्बू तडवी व अन्न महामंडळ सदस्य रामेश्वर पाटील आदी पदाधिकारी यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता पहूर ता.जामनेर येथे घडली. या थरार घटनेत १०ते १२ जण बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाटील यांच्या निवासस्थानासमोर अब्बू तडवी व रामेश्वर पाटील हे चर्चा करीत होते. त्याचवेळी एम.एच. १८ बी.जी. ४१४२ क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक भरधाव वेगाने पदाधिकाऱ्यांच्या दिशेने आला. ट्रकचा वेग संशयास्पद वाटल्याने पाटील यांनी तडवी यांना ढकलत आरडाओरड केली. त्यामुळे उपसरपंच राजू जाधव यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्ते बचावले आहेत. हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे, अशी फिर्याद रामेश्वर पाटील यांनी पहूर पोलिसात दिल्यावरून चालक मोहसीन खाँन नबाब खाँन (रा. चाळीसगाव ह.मु.निहाल नगर मालेगाव जि.नाशिक) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.