अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक कारागृहातून कैदी फरार होत असल्याच्या घटना आता काही नवीन राहिलेल्या नाही. अशीच एक घटना संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. बुधवारी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. राहुल देविदास काळे, रमेश थापा अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार गुन्हेगारांची नावे आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. या कारागृहामध्ये बंद असलेल्या कैद्यांची मनमानी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नेहमी वादावादीच्या घटना घडतात. बुधवारी पहाटे या कारागृहातील तीन नंबरच्या कोठडीचे गज कापून या आरोपींनी पलायन केले. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते. पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे दिसत आहे. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले. कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तरीही हत्यार कसे उपलब्ध झाले, असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.