जळगाव : प्रतिनिधी
पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी टास्क पूर्ण करा, असे सांगत प्रियंका प्रवीण जैन (३२, रा. भुसावळ) यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. यात नोकरी तर मिळाली नाही, शिवाय हातची रक्कमही गेली. याप्रकरणी निधी व अमित असे नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील गृहिणी असलेल्या प्रियंका जैन यांच्याशी १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान वेळोवेळी निधी व अमित, अशी नावे सांगणाऱ्या दोघांनी संपर्क साधत त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखविले. त्यासाठी एक टास्क दिला व तो पूर्ण होण्यासाठी खाते रिचार्जच्या नावाने वेळोवेळी रक्कम स्वीकारली. सुरुवातीला जैन यांना १६ हजार ७८० रुपये व नंतर ३५ हजार २४५ हजार रुपये पाठवून विश्वास संपादन केला. दोघांनी वेळोवेळी एकूण सहा लाख ४१ हजार ८१९ रुपये ऑनलाइन स्वीकारले. त्यापैकी केवळ ५२ हजार २५ रुपये परत मिळाले. त्यामुळे त्यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी प्रियंका जैन यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत…