मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात आगीची घटना घडत असतांना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाउंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशा बनवणाऱ्या शेजल एंटरप्रायझेस कारखान्यात मंगळवारी सायंकाळी उशिरा शॉर्टसर्किटने आग लागण्याची दुर्घटना घडली.
आगीत कारखान्यात काम करणारी महिला व तिच्यासोबत आलेला तीनवर्षीय चिमुकला यांचा होरपळून मृत्यू झाला. शकुंतला रवी राजभर (वय ३५) व प्रिन्स राजभर (३) असे मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. कारखान्यात शॉर्टसर्किटने आग लागली.
आगीची माहिती मिळताच कंपनीत काम करणारे महिला व पुरुष कामगार बाहेर पळाले त्यामध्ये शकुंतला हीसुद्धा होती; परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्यासोबत आलेला तीन वर्षांचा प्रिन्स मुलगा आतमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये मुलाला वाचविण्यासाठी गेली होती. मात्र, भीषण आगीत मुलासह तिचाही होरपळून मृत्यू झाला. भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी आग विझविली.
पाण्याची कमतरता असल्याने आग विझविण्यात अडचण आली. खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलानेशर्थीचे प्रयत्न केले. गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरूमजवळ दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाला आढळले.