पुणे : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही वर्षापासून अनेक तरूणासह तरुणीना लुटण्याचे प्रकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत असतात. अशाच प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. डेटिंग अॅपवर तरुणांशी ओळख केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवून हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगून त्यांना लुटणाऱ्या परप्रांतिय महिलेला व एका पुरुषाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून 50 लाख 69 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींनी डेटिंग अॅपद्वारे ग्राहकांना आकर्षित करून त्यांना हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून घेऊन त्यांच्याकडून ठरलेली रक्कम घेत होते. त्यानंतर ग्राहकाला दमदाटी व मारहाण करुन आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईन घेऊन ग्राहकाकडील मौल्यवान वस्तू, दागिने जबरदस्तीने चोरून लुटत होते. अशा प्रकारे पुण्यातील नागरिकांना आरोपींनी लुटले होते. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभगाकडून तपास सुरु असताना आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पुण्यातील विमानतळ, सिंहगड रोड, हिंजवडी आणि पनवेल येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींनी पुणे शहरासह महाराष्ट्र, हैदराबाद, बँगलोर या राज्यातील लोकांना सीकींग अॅडव्हेंचर या डेटिंग अॅपद्वारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 50 लाख 69 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.