पुणे : वृत्तसंस्था
गुन्हेगारी घटनेत सातत्याने पुणे शहराचे नाव येत असून आज पुन्हा एकदा पुणे शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातीव लोहगाव परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत खुलासा होईल.
पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, लोहगाव परिसरात किरण बोबडे आणि आरती बोबडे पती-पत्नीची भाड्याच्या घरात राहत होते. घरमालक तळमजल्यावर आणि बोबडे दाम्पत्य वर राहत होते. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून दुर्घंधी येत असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
त्यावेळी त्यांना किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मुळचा माजलगाव बीड येथील आहे. तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून एका खासगी बँकेत नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.