नंदुरबार : वृत्तसंस्था
तालुक्यातील धानोरा येथे सुरु असलेल्या पुलाच्या बांधकाम साईटवरुन सुपरवायझरसह चौघांनी साहित्य चोरी केले. ही बाब ठेकेदाराला सांगू नये, यासाठी ठेकेदाराच्याच नातेवाईकाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. यामुळे संबंधिताने आत्महत्या केली. याप्रकरणी सुपरवायझरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील पुलाचे काम सुरु आहे. काम सुरु असलेल्या साईटवरुन सुपरवायझर असलेला प्रकाश धुडकू सदाशिव (रा. धुळे), भैय्या कोळी उर्फ भैय्या महाराज (रा. धानोरा), पिंटू (रा. भांगडा) व राजल्या ( रा. धानोरा ता. नंदुरबार) अशा चौघांनी सिमेंट व स्टिलची चोरी केली. ही बाब ठेकेदाराचे नातेवाईक किरण चुडामण वाडेकर (वय ४९, रा. धुळे) यांच्या लक्षात आली. यामुळे चौघांनी केलेली चोरी ठेकेदाराला सांगू नये, यासाठी त्यांनी संगनमत करुन किरण वाडेकर यांना मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. सातत्याने चौघेजण किरण वाडेकर यांचा छळ करत होते. चौघांच्या छळाला कंटाळून किरण वाडेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी फिर्याद विकास सुधाकर सोनवणे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.