प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: ग्रामीण रुग्णालयात आज दि. ०१ डिसेंबर २०२१ रोजी २० व्यक्तींच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी च्या माध्यमातून यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ५ वर्षात पहिल्यांदाच धरणगाव येथे आज ओटी सुरू झाली. यामध्ये २/३ सिझेरियन झालेल्या अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी द्वारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्या. त्यांना जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व स्त्रीरोग तज्ञ डॉ. लिलाधर बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले. ओटी मध्ये मोरावकर, भदाणे, सोनार व लांडगे सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे व विनामूल्य झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. संतती नियंत्रण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय सिव्हिल सर्जन व वैद्यकीय अधिक्षक यांचे आभार मानले. यापुढे देखील ग्रामीण रुग्णालयात अशाच प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, ग्रामीण रुग्णालयातील ओटी चे सातत्य कायम रहावे आणि गोरगरिबांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा, असा आशावाद नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या लोकोपयोगी शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तसेच ग्रामीण रुग्णालय धरणगावच्या सर्व नर्सिंग स्टाफ व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.