पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक उच्चशिक्षित तरुणीना सध्या नोकरी नसल्याने अनेक तरुणी बेरोजगार आहे. त्यासाठी अनेकवेळा तरुणीना मोबाईलवर नोकरी विषयक फोन येत असतात. अशाच एका फोनमुळे तरुणीला मोठा फटका बसला आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षाच्या तरुणीला पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून रिल्स लाईक करण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तरुणीला 11 लाखांचा गंडा घातला.
याबाबत मिनल माणिकराव निखाडे (वय-25 रा. कोथरुड) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी टेलीग्राम युजर आयडी धारकावर आयपीसी 420,34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना देविका मीलर आणि अंजली शर्मा या टेलिग्राम युजर आयडी धारकांनी संपर्क केला. त्यांना DEVIKA MILLER HR Assistance of Influencer Marketing Hub Company मधून बोलत असल्याचे सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला. तरुणीला रिल्स लाईक करण्याचा टास्क देऊन हा टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त कमिशन मिळेल असे सांगितले. तरुणीने टास्क पूर्ण केल्यानंतर तिला जास्त कमिशनचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. तरुणीने सायबर चोरट्यांवर विश्वास ठेऊन त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन 10 लाख 89 हजार 952 रुपये पाठवले. त्यानंतर कोणताही टास्क न देता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.