नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताचे सत्र सुरु असतांना नुकतेच नवीन नाशिक परिसरातील रगवारे चौफुलीसमोर असलेला उड्डाणपुलाचा रस्ता ओलांडत असताना चारचाकी कारने दिलेल्या धडकेत ३३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. गोरख कडूबा जाधव (वय ३३ रा. कौतेकरवाडी, पाथर्डी शिवार) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख जाधव हे पाथर्डी सर्व्हिसरोडवरील एका खासगी वॉशिंग सेंटरमध्ये काम करीत होते. ते शुक्रवारी कामावरून घरी जात असताना गरवारे चौफुली येथे उड्डाण पुलावरून पांडवलेण्याच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी कार ( डी एन ०९ क्यु ७१५७) ने जाधव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात जाधव वीस ते पंचवीस फूट लांब अंतरावर कारखाली घसरत गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागी मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक ओमकार राजेंद्र कानडे (वय २४, गोविंदनगर) याला त्याच्या चारचाकी सहित अंबड एमआयडीसी चौकीच्या पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर माच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


