छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातून समोर आली आहे. भावाला व्याजाने एक लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी दिले खरे; पण याच पैशांसाठी बहिणीने सख्ख्या भावाचा गुंडांच्या मदतीने खून केला. ही घटना १ नोव्हेंबररोजी बेगमपुरा भागात समोर आली होती. विशेष म्हणजे, आत्महत्या केल्याचा बनावही केला. मात्र, घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मृत भावाला झालेल्या जखमा आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बेगमपुरा पोलिसांना ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा अहवाल दिला.
त्यानंतर या प्रकरणात बहिणीसह तिचा दूरचा नातेवाईक, त्याचे मित्र अशा पाचहून अधिक जणांविरोधात २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, ही घटना समोर आली तेव्हा बहीणच गायब होती, त्यामुळे तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल ११ जणांना ताब्यात घेतले. जगदीश ज्योतिष फत्तेलष्कर (वय ४०, लालमंडी, बेगमपुरा) असे मृत भावाचे नाव आहे.
रीना राजेश यादव (कुटलेवाले), रितेश रामलाल मंडले ऊर्फ यादव (रा. दोघेही लालमंडी, बेगमपुरा मूळ रा. अकोट, जि. अकोला) रितेशची आई आरोपी रमाबाई रामलाल मंडले (रा. अकोट), लखन, गोलू यांच्यासह इतर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृत जगदीश यांच्या पत्नी किरण फत्तेलष्कर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. मृत जगदीश यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी जगदीश यांनी मुलीच्या लग्नासाठी आरोपी बहीण रीनाकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.