धुळे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील एका मंडळ अधिकाऱ्याने २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार याला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
शिरपूर तालुक्यातील वरुळ शिवारात असलेल्या शेतजमिनीची वाटणी करण्यावरून तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाद होता. त्यांच्यात वाटणी करण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला. संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून दिली. नोंदणीचे काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी मुकेश भावसार यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली.
मात्र तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागातर्फे तक्रारीची खात्री करत दोन हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी संशयित भावसार यांना पकडण्यात आले. मंडल अधिकारी यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.