पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची कारवाई सुरु असतांना जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत केली आहे.
बंगलोर-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळाली. त्यानुसार, रावेत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचण्यात आला. पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेझ कंपनीचे 14 चाकी वाहन (एमएच 15 एफव्ही 7940) आडवले.
वाहनामध्ये 50 किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेले 80 पोती आढळून आली. या पोत्यांच्या खाली गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत 750 मि.ली. क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या या प्रमाणे 431 बॉक्स (5,172 बाटल्या), 180 मिली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या याप्रमाणे 785 बॉक्स (37,680 बाटल्या) तसेच 500 मिली क्षमतेच्या किंगफिशर बिअरचे 40 बॉक्स (960 बाटल्या) असा एकूण 74 लाख 56 हजार 200 रुपयांचा मद्याचा साठा जप्त केल्या. पथकाने रॉयल ब्ल्यू व्हिस्की (Royal Blue Whiskey), आईस मॅजिक ऑरेंज वोडका (Ice Magic Orange Vodka) व रॉयल ब्लंक माल्ट व्हिस्की (Royal Blunk Malt Whisky) च्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पथकाने मद्य आणि वाहन असा एकूण 1 कोटी 19 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.