नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना एक धक्कादायक अपघात दिल्लीत घडला आहे. फिल्ममेकर पीयूष पालसोबत घडला आहे. अपघातानंतर पीयूष पाल अर्धा तास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडत राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत राहिले. अशामध्ये तडफडूनच पियूषचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीयूष पालचा दिल्लीमध्ये अपघात झाला. पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. आपल्या बाइकवरून पीयूष दक्षिण दिल्लीतील पंचशील एन्क्लेव्हजवळील ट्रॅफिक सिग्नलवर लेन बदलत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या बाइकने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर पीयूष आपल्या बाइकसह लांबपर्यंत खरचटत गेला. हा अपघात इतका भीषण होता की पीयूष गंभीर जखमी झाला होता.
पीयूष रस्त्यावरच अर्धातास रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. या रस्त्यावरून जाणारे नागरिक जखमी पीयूषचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात दंग राहिले. पण एकही जण पुढे येऊन पीयूषला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला नाही. त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने पीयूषला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या अपघातामध्ये पीयूषचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास हा अपघात झाला आणि पियुषला ११ वाजता वैद्यकीय मदत मिळाली. पीयूषला योग्यवेळी मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता.