बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातून समोर आली आहे. येथील जुनी भाजी मार्केट गजबजलेला परिसरात भर दिवसा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीच्या किराणा सामानाच्या पिशवीतून ५० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस त्या चार चोरट्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथी राहणार फिर्यादी दिगंबर ज्ञानदेव वाघ यांनी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. दिगंबर वाघ यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी स्टेट बँक कृषी शाखा जळगाव जामोद येथुन ५० हजार रुपये काढले. ही रक्कम कापडी पिशवीमध्ये ठेवुन त्यांनी खरेदी केलेल्या किराणा सामानाच्या थैलीमध्ये ठवले होते व ती पिशवी त्यांचे मोटर सायकलला बांधुन एका जनरल स्टोअर्ससमोर उभी केली. त्या स्टोअर्स मध्ये गेले असता पाळत ठेवलेल्या चार जणांनी त्या पिशवीतील ५० हजार रुप्याची पिशवी काढून पळ काढला.
दिगंबर वाघ हे जनरल स्टोअर्समधुन थोड्याच वेळात मोटरसायकलजवळ आले असता त्यांचे मोटरसायकलवरील किराणा समानाची पिशवी अस्ताव्यस्थ दिसली. त्यांनी पिशवी उघडुन पाहली असता त्यामध्ये ठेवलेली पैशांची कापडी पिशवी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शेजारील मोहन ट्रेडर्स जळगाव जा. यांचे दुकानमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता चार अनोळखी आरोपी गाडीच्या भोवती फिरत पाहणी करुन एकाने गाडीला बांधलेल्या किराणा थैलीतील नगदी रक्कम ठेवलेली कापडी पिशवी काढून पसार झाल्याचे दिसले. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ समाधान तायडे करीत आहे.