रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील भाटखेडा शिवारातील मेंढपाळ वाड्यातील चिमाबाई देवा कोरडकर असे नाव असून या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या चिमाबाई देवा कोरडकर (वय २५, रा. मुंजलवाडी ) हिचा पाय घसरून विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. धुरखेडा येथील पट्टीचे पोहणाऱ्यांनी तिचा मृतदेह सुमारे पावणे दोनशे फूट खोल विहिरीतील ७५ फूट पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान, मयत चिमाबाईच्या जेठाच्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चिमाबाईचे आई-वडील दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर शिंदखेडा (जि. धुळे) येथून येत असलेल्या तिच्या आई वडिलांच्या प्रतीक्षेत रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, विवाहितेचे मूळ माहेर भोलाणे (ता. बऱ्हाणपूर) येथील असल्याने तिच्या माहेरातील नातेवाइकांनी मयत नवविवाहितेच्या अकस्मात मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने दोन्ही गट परस्परांशी भिडल्याने रावेर ग्रामीण रुग्णालय परिसर व स्टेशन रोडवर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकच गोंधळ उडाल्याने फौजदार सचिन नवले व दीपाली पाटील यांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित केली.