जळगाव : प्रतिनिधी
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर याने विनयभंग केल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातून जळगावात आजीकडे शिक्षणासाठी आलेली एक २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह करीत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेलाही याची माहिती दिली.
विद्यार्थिनी व पालक यांनी घाबरलेल्या अवस्थेत श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, शहर प्रमुख अशोक शिंदे यांना मदत मागितले. त्यांच्यासह समाजसेविका सुचित्रा महाजन, दीपक दाभाडे यांनी विद्यार्थिनीला हिंमत देत पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार सदर विद्यार्थिनीने ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कैलास कडभाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.