नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली असून यात महिला अत्याचार, खंडणी तसेच लुटमारीच्या घटना सर्वाधिक घडत आहे. अशातच रिक्षातून कॉलेजला निघालेल्या एका तरुणीचा दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला सरेंडर करण्यास सांगितलं.
मात्र, आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपीचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद शहरात ही घटना घडली. कीर्ती सिंग असं मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. तर जितेंद्र उर्फ जीतू असं एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी कीर्ती सिंह ही मूळ उत्तरप्रदेशच्या हापूर शहरातील पन्नापुरी भागातील रहिवासी होती. ती गाझियाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात B.Tech च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.
२७ ऑक्टोबर रोजी ती आपल्या मैत्रिणीसोबत ऑटोने कॉलेजमधून घरी परतत होती. यावेळी दोन आरोपी दुचाकीवरुन आले. त्यांनी धावत्या रिक्षात कीर्तीच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. कीर्तीने याला विरोध केला असता, आरोपींनी हात पकडून तिला रिक्षाबाहेर खेचलं. यानंतर तिला ४ ते ५ किमीपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत कीर्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, स्थानिकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. तर दुसरा आरोपी जितेंद्र उर्फ जीतू हा फरार होता. रविवारी पोलिसांनी आरोपी जितूला मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानाहर रेल्वे ट्रॅकवर घेरलं. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तर पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये आरोपी जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.