मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक रेल्वेत एक डबा महिलासाठी राखीव असतो याठिकाणी महिला पोलीस देखील कार्यरत असतात. असाच एका लोकलमध्ये महिला डब्यात चढण्यास नकार देणाऱ्या महिला होमगार्डला एका तरुणाने मारहाण केल्याची घटना वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकलमध्ये घडली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करून पसार झालेल्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मारुती आत्रम असे या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला डब्यात तैनात होम गार्डला मारहाणीची घटना घडत असेल तर महिलांचा रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वासिंद रेल्वे स्थानकात एका तरुणाने कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे लोकलच्या महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. या महिला डब्यात कर्तव्यावर असलेल्या महिला होम गार्ड नीरजा मुकादम यांनी या तरुणाला महिलांच्या डब्यात चढण्यास मज्जाव केला. मात्र मुजोर तरुणाने नीरजा याना ढकलून डब्यात प्रवेश केला.
महिला होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण देखील केली. आसनगाव रेल्वे स्थानक येताच या तरुणाने लोकल मधुन उतरून पळ काढला . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाने या आरोपीचा शोध घेतला. अवघ्या २४ तासात महिला होमगार्डला मारहाण करणारा आरोपी मारुती आत्रम याला अटक केली आहे.