नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असतांना गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताअसलेले आसामधील माजी पंचायत सदस्य आणि भाजप नेते अब्दुल सत्तार यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी परिसरातून पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक राजकारणी अब्दुल सत्तार २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती.
सत्तार यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे शंका आहे. करीमगंज जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिमा दास यांनीही हत्येचा संशय व्यक्त केलाय. तसेच सत्तार यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अब्दुल सत्तारच्या हत्येत स्थानिक काँग्रेस नेता सुरमन अली आणि त्याचे मित्र सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सत्तार यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑक्टोबर रोजी सत्ता जेव्हा घरी होते त्या रात्री ९ वाजता त्यांना अनेक कॉल आले होते. सत्तार यांना स्थानिक आमदाराच्या घरी एका महत्त्वपूर्ण बैठकीला जायचे होते. अशी माहिती कुटुंबियांना दिली. कार्यक्रमाला गेले त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कॉलही लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना याची माहिती देण्यात आल्याचं कुटुंबियांनी सांगितले. मृत सत्तार यांच्या मुलाने पत्रकरांना दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी सत्तार यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या गटाने धमकावले होते. तर सत्तार यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तार यांचे हात-पाय बांधलेले होते. तसेच त्यांचा मृतदेह एका गोणीत भरलेला होता. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह मोठ्या दगडांसह नदीत फेकण्यात आला होता. दरम्यान पाथरकांडीचे भाजप आमदार कृष्णेंदू पॉल यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलीय.