मुंबई : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक मुल मुली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. अशाच सोशल मिडीयावर अवघ्या दोन आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर सुहाना नावाच्या मुलीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट मिळाली. ती पॉलिसी विकणाऱ्या कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरने एक्सेप्ट केली. त्यानंतर ती भेटायलाही आली आणि बोलण्यात गुंतवत त्याचा मोबाईल घेऊन पसार झाली. हा प्रकार मालाड पश्चिम परिसरात घडला असून बांगुर नगर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अब्दुल ( नावात बदल) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो २५ ऑक्टोबर रोजी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला सुहाना या नावाचा आयडीवरून मालाड पश्चिम च्या इन्फिनिटी मॉलमध्ये भेटण्यासाठी मेसेज आला होता. त्याच्या दोन आठवड्यापूर्वी याच आयडीवरून आलेली रिक्वेस्ट त्याने एक्सेप्ट केल्यानंतर अब्दुल आणि सदर खातेधारक एकमेकांशी चॅटिंग करत होते. सुहानाने भेटायला बोलवल्यानंतर संध्याकाळी साडे चारच्या सुमारास अब्दुल त्या ठिकाणी पोहोचला.
तेव्हा मॉल समोर सुहाना आणि तिची मैत्रिणी बुरखा परिधान करून उभ्या होत्या. हे सर्व भेटल्यावर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांनी फूड कॉर्नर हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केले. काही वेळाने त्या दोघींमध्ये अज्ञात कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला आणि सुहानासोबत असलेली महिला तिथून रागाने निघून गेली. तिला फोन करण्यासाठी सुहानाने अब्दुलकडे त्याचा मोबाईल मागितला जो त्याने तिला दिला. मोबाईल दिल्यावर फोनवर बोलत बोलत सुहाना तिथून पसार झाली. ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचा पाठलाग केला मात्र ती सापडलीच नाही. अब्दुलने तिची वाट पाहिली तसेच दिवसभर शोध घेतला आणि अखेर २६ ऑक्टोबर रोजी बांगुरनगर पोलिसात धाव घेत तक्रार केली.