नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक घटना सोशल मिडीयावर जलद गतीने व्हायरल होत असतात. असाच एक अनुभव नुकताच आला ज्यामुळे पोलिसांची नुसती धावपळ उडाली. असं काय होतं त्या ट्विटमध्ये ? जयपूर बांद्रा एक्सप्रेस मध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेषात असल्याचे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. एका इसमाने रेल्वे हेल्पलाइन वर ट्विट हे केलं होते. ही ट्रेन लवकरच पालघर स्टेशनवर पोहोचणार होती, हे कळताच पालघर रेल्वे स्टेशनला अक्षरश: छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे हेल्पलाइनला टॅग करत एक फोटो पोस्ट केला होता. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये चार संशयित दहशतवादी असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. त्या इसमाने त्या चार साधूंसोबत सेल्फी घेऊन तो फोटो पोस्ट करत वरील माहिती लिहीली होती. मात्र हे ट्विट वाचताच रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. या ट्विटची दखल घेत रेल्वे पोलिस सतर्क झाले आणि त्यांनी पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मोठा बंदोबस्त तैनात केला.
जयपूर बांद्रा एक्सप्रेस ही पालघर रेल्वे स्थानकात पोहोचताच पोलिसांनी ट्रेनमध्ये चढून तातडीने शोधमोहिम सुरू केली. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी साधूंच्या वेषात असलेल्या चार व्यक्तींना ताब्यात घेऊन ट्रेनमधून खाली उतरवलं. ज्या इसमाने हे ट्विट केले तोसुद्धा त्यांच्यासोबतच होता. पोलिसांनी त्या सर्वांना प्लॅटफॉर्मवर उतरवून त्यांची कसून चौकशी केली, झडतीही घेतली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ते दहशतवादी नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. या संपूर्ण चौकशी प्रक्रियेदरम्यान ही एक्स्प्रेस पालघर स्थानकात सुमारे 15 मिनिटं थांबवण्यात आली होती.