धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील औषधाचे दुकान फोडून त्यातील रोकड आणि इतर साहित्य चोरून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चिंतामणी मोरया परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री केंद्रातील श्री स्वामी समर्थ मुद्रण आणि आयुर्वेदिक औषधीचे दुकान फोडून रोकड आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे अडीच हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी केंद्रातील दानपेटी ही लांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही दानपेटी फोडण्यात अपयश आल्यामुळे चोरट्यांनी दानपेटी तेथेच सोडून पळ काढला. सकाळी नेहमी प्रमाणे भाविक केंद्रात आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.