भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गुढे येथील लवण शिवारात गट नंबर ९८ मध्ये बिबट्याने बांधलेल्या बैलावर हल्ला चढवीत फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात असंख्य जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. याबाबत तक्रार करूनही वनविभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून बहाळ नावरे, पथराड, कोळगाव, सावदे, जुवार्डी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. शुक्रवारी पहाटे लवण शिवारात आनंदा महाजन यांच्या गट नंबर ९८ मध्ये बांधलेला चार वर्षांचा बैल बिबट्याने ठार केला. शेतकरी सुनील नामदेव महाजन सकाळी शेतात गेले असता बैल मृतावस्थेत दिसून आला. एखाद्या शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर वन विभाग बिबट्याला जेरबंद करील का? असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांनी केला आहे. या बिबट्याला वनविभागाने लवकर जेरबंद केले नाही तर गुढे येथील शेतकरी बचाव कृती समिती तीव्र आंदोलन करील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.