मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना सध्या अशाच एका गुन्हेगारी कृत्याने मुंबई येथील वडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचं वय साधारणपणे ३० ते ४० च्या दम्यान असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेचे तीन तुकडे करण्यात आले होते. त्यापैकी डोकं धड आणि एक पाय पोलिसांना सापडला आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील आमच्या गस्ती पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती, ज्यामध्ये एक जळालेला मृतदेह होता. आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, BPT (मुंबई पोर्ट ट्रस्ट) च्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वडाळा परिसरात एक मृतदेह दिसला. त्यानंतर वडाळा पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासोबतच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेचा मृतदेह एका पिशवीत होता.संशय आल्याने पिशवीची तपासणी केली असता तो अर्ध जळालेला मृतदेह आढळून आला.