नांदेड : वृत्तसंस्था
राज्यभरात आता मराठा आंदोलनकर्ते संतप्त झाले जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली असून राज्यातील अनेक गावामध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसताना दिसून येत आहे.
नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले. आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असं म्हणत संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरलं. यावेळी एक मराठा, लाख मराठा. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली.
दरम्यान, संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, मराठा समाजाच आक्रमक झाल्याचं लक्षात येताच चिखलीकर यांनी तातडीने अंबुलगा गावातून काढता पाय घेतला. विशेष बाब म्हणजे, गुरुवारी अंबुलगा येथील मराठा संघटनांनी गावात एकमताने ठराव घेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. ही बाब चिखलीकर यांच्या लक्षात नव्हती. अशातच चिखलीकर आणि त्याचे कार्यकर्ते अंबुलगा गावात येताच मराठा तरुण एकत्र जमले. त्यांनी वाद घालत चिखलीकर यांना गावातून परत पाठवले.