पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न सुरु असतांना अनेक चौकाचौकात पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सज्ज असतात. अशीच एक कारवाई बुधवारी सुरु होती. ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केल्यामुळे एकाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी सैन्य दलातील जवानाला अटक केली आहे.
ही घटना बुधवार चौकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी रमेश ढावरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिस कर्मचारी पंकज शंकर भोपळे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वैभव संभाजी मनगटे (वय २५, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनगटे हा सैन्यदलात जवान म्हणून नेमणुकीस आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ढावरे चार सप्टेंबर रोजी बुधवार चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी ढावरे यांनी दुचाकीस्वार मनगटे याच्यावर ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. याबाबत शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नोंद केली होती. त्याचा राग मनात धरून मनगटे याने सायंकाळी ढावरे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याने ढावरे यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. त्यानंतर तो पळून जात होता. परंतु पोलिसांनी पाठलाग करून मनगटेला शनिवारवाड्याजवळ पकडले. दीड महिन्यापूर्वी कारवाई केल्याचा राग मनात होता. त्यामुळे ढावरे यांना मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या हल्ल्यात ढावरे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.