धुळे : वृत्तसंस्था
खान्देशातील धुळे जिल्ह्यातील बोरकुंड व मोघन परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा चांगलाच हैदोस बघायला मिळत आहे. हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असताना वन विभागाकडून अद्याप कोणताच बंदोबस्त करण्यात आलेला नाही. याच दरम्यान बिबट्याने आणखी एका मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात शेतातून वडिलांसोबत घरी परतत असलेल्या लहान मुलावर हल्ला केला होता. त्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील उघडकीस आली होती. त्यानंतर दोनच दिवसात त्याच परिसरामध्ये असलेल्या मोघन येथे बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धुळे तालुक्यातील दहा वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात बालक गंभीररित्या जखमी झाला असून, त्यास तात्काळ धुळ्याच्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.