लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील पोलीस उपनिरिक्षकावर हल्ला करून धमकावल्याच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. हे पोलीस निरीक्षक गस्तीवर होते. यातील मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर असे कि तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ टोळक्याने फौजदारावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार निखिल राजपूतसह गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, अक्षय न्हावकर उर्फ थापा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वच्या सर्व संशयित फरार झाले होते. त्यातील चेतन संतोष पाटील (वय २९), नीलेश चंद्रकांत ठाकूर (२१), ओमकार उर्फ गोलू विठ्ठल कोल्हे (२२) व आकाश गणेश पाटील (२३, सर्व रा.श्रीरामनगर, भुसावळ) या चौघांना वांजोळारोड परिसरातून अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा मात्र अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.