अलिबाग : वृत्तसंस्था
राज्यभरातील अनेक परिवारात वाद सुरु असतात पण हेच वाद काही वेळाने थांबत असतात तर काही वाद अखेरच्या टोकाला देखील जात असता अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भावाने अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी सूप मध्ये दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली असल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे गावात १६ ऑक्टोबर रोजी जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (३४) व स्नेहल मोहिते (३०) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सोनालीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर दुसरी बहिण स्नेहल हीचा एम.जी.एम रुग्णालय मध्ये मृत्यू झाला होता. यावेळी स्नेहलचा मृत्युपूर्व जबाब घेण्यात आला होता. घटनेची फिर्याद त्यांचा भाऊ गणेश यानेच दिली होती व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सोनालीच्या शव विच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांचा संशय वाढला व तपासला वेगळे वळण मिळाले होते.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की आरोपी गणेश मोहीते यांचे आई व बहिणीसोबत पटत नव्हते. त्याचे वडील वन विभागात कामाला होते. त्यांच्यामध्ये नेहमी प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होता. अनुकंपा तत्वावर नोकरीमध्ये कायम करण्यासाठी लागणारी संमती दोन्ही बहिणी देत नव्हत्या. याचा राग त्याच्या मनात होता. म्हणून त्याने दोन्ही बहिणींना सूप मध्ये विष घालून पिण्यास दिले व त्यानंतर पाणी पिल्याने त्यातून विषबाधा झाली असे दाखविण्याचा प्रयत्न आरोपीने केला. तसेच पोलिसांचे लक्ष भरकटवण्यासाठी नातेवाईक व शेजाऱ्यांनी हे केले असावे असे वातावरण निर्माण केले होते.
मात्र, पोलीस तपासात आरोपीने गुगलवर वेगवेगळे विषारी औषधे सर्च केले असल्याचे व त्यात वास न येणारे विषारी औषधाचा अभ्यास केला होता असे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्या कारची झडती घेतली असता उंदीर मारण्याचे रेटोल या औषधाची माहितीपत्र मिळून आले. कोणाला संशय येवू नये म्हणून आरोपीने एक महिना अगोदर पासून घरात सूप बनविणे आणि सुपचे महत्व सांगणे सुरू केले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. आरोपीची कसून तपासणी केली असता आरोपीने दोन्ही बहीणींना संपविले असल्याचा कबुली दिली असल्याचे अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.